मेलबर्न- अॅश्ले बार्टी पाठोपाठ रोमानियाच्या अनुभवी सिमोना हालेपचेही ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उपांत्य फेरीत स्पेनच्या गरबाइन मुगुरुजा हिने हालेपला धूळ चारली. दरम्यान, बार्टी आणि हालेप यांच्या पराभवाने, यंदा ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे.
मुगुरुजाने जागतिक क्रमवारीत ३ स्थानावर असलेल्या हालेपला ७-६, ७-५ अशी मात दिली. दोन तास ५ मिनिटे रंगलेल्या सामन्यात मुगुरूजा सरस ठरली. २०१६ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०१७ मध्ये विम्बल्डन जिंकणारी मुगुरुजा हिला अडीच वर्षांनी ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली.
ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या ११ दिवशी महिला एकेरीत उलटफेर पाहायला मिळाला. उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या अॅश्ले बार्टीला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या सोफिया केनिनने बार्टीला ७-६, ७-५ अशी धूळ चारली. या पराभवाबरोबर बार्टीचे २०२० या वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी आणि सोफिया केनिन यांच्यात १ तास ४५ मिनिटे लढत रंगली. यात सोफियाने पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला. बार्टी दुसऱ्या सेटमध्ये उलटफेर करेल, अशी आशा होती. पण, सोफियाच्या आक्रमक खेळासमोर ती हतबल ठरली. दुसरा सेट सोफियाने ७-५ असा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. सोफियाने पहिल्यादांच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.