न्यूयॉर्क - यावर्षीच्या शांघाय मास्टर्स आणि चीनमधील डब्ल्यूटीए फायनल्ससह सर्व टेनिस स्पर्धा कोरोनाव्हायरसमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. एटीपी, डब्ल्यूटीए यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. चीनमध्ये क्रीडा प्रशासनाच्या वक्तव्यानंतर एटीपी, डब्ल्यूटीएने हा निर्णय घेतला असून यावर्षी देशात कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.
एटीपीने म्हटले आहे, की शांघाय मास्टर्स व्यतिरिक्त चीन ओपन, चेंगदू ओपन आणि झुहाई चॅम्पियनशिप देखील यंदा होणार नाहीत. रद्द करण्यात आलेल्या डब्ल्यूटीएच्या सात स्पर्धांमध्ये चीन ओपन, वुहान ओपन, जिआन्सी ओपन, झेंझोऊ ओपन, एलिट ट्रॉफी आणि ग्वांग्झोऊ ओपन यांचा समावेश आहे.