लंडन - तीन वेळा ग्रँडस्लँम विजेता ब्रिटनचा खेळाडू अँडी मरेने दोन महिन्यातील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. रोहम्प्टन येथील ब्रिट्स प्रीमियर लीगमध्ये मरेने डॅन इवान्सला सरळ सेटमध्ये पराभूत केले.
हेही वाचा -पाँटिंग म्हणतो, ''कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश मिळू शकतो''
३३ वर्षीय मरेने दुखापतीमुळे जर्मनीच्या कोलोन स्पर्धेतून माघार घेतली होती. ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये पार पडली. माजी अव्वल क्रमांकाचा खेळाडू असलेल्या मरेने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत इवान्सला ७-६, (७-५), ६-४ अशी धूळ चारली. इवान्स सध्या ब्रिटनचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे.
या स्पर्धेपूर्वी, मरेने यंदा फक्त सात सामने खेळले आहेत. कोरोना आणि दुखापतीमुळे खेळण्याच्या प्रक्रियेत काळ निघून गेला असला तरीही, मरे कोर्टवर वेगवान हालचाली करताना दिसून आला.
यूकेचे टेनिस प्रशासकीय मंडळ लॉन टेनिस असोसिएशनने ही चार दिवसीय स्पर्धा आयोजित केली होती. आगामी वर्षात ब्रिटनच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता यावी, म्हणून असोसिएशनने ही स्पर्धा ठेवली होती.