मुंबई -देशातील 80 ते 90 टक्के प्रतिभेचा वापर अद्याप झालेला नाही. कारण खेळ हा फक्त शहरापर्यंत मर्यादित आहे, असे मत भारताचा दिग्गज पुरूष टेनिसपटू लिएंडर पेसने व्यक्त केले. पेसने शुक्रवारी आयएएनएसला मुलाखत दिली. यात त्याने विविध विषयावर आपले मत व्यक्त केले.
लिएंडर पेस म्हणाला की, आपली 80-90 टक्के प्रतिभा अद्याप पुढे आलेली नाही, असे मला वाटते. ही बाब मी यासाठी सांगत आहे की, अधिकतर टेनिस हा खेळ मोठ्या शहरामध्ये खेळला जातो. शहर आणि ग्रामीण भागात खूप प्रतिभा आहे.
जर आपण ऑलिम्पिक पदकाकडे पहिले तर आपण टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सात पदके आपण जिंकली. यातील बहुतांश खेळाडू हे ग्रामीण भागातील आहेत. आपल्याला वेगवेगळ्या खेळात प्रतिभावान खेळाडू शोधण्याची गरज आहे. मेट्रो शहरात आपल्याकडे सुविधा आहेत. जसे की, भारतीय क्रीडा प्राधिकरण असो की खेलो इंडिया. याचा वापर आपण खेळाडूंच्या प्रतिभेला चालना आणि देशात चॅम्पियन खेळाडू घडवण्यासाठी करू शकतो, असे देखील पेस म्हणाला.