टी 20 विश्वचषकातील आजचा सामना इंग्लंड विरुध्द बांग्लादेश यांच्यात सुरू आहे. नाणेफेक जिंकून बांग्लादेशने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडच्या संघाने उत्तम क्षेत्ररक्षण आणि टिच्चून गोलंदाजी करीत बांग्लादेश संघाला 9 बाद 124 धावांवर रोखले.125 ही धावसंख्या इंग्लंडने सहज गाठली आणि 8 गडी राखून बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवला आहे.
जेसन रॉयच्या दमदार खेळीने हा विजय साकारणे इंग्लंडला सोपे गेले. त्याने 38 चेंडूत 61 धावा काढल्या. त्याला जॉस बटलरने 18 धावा काढून साथ दिली. बटलर बाद झाल्यानंतर डेविड मालनने 28 नाबाद धावा केल्या आणि जॉनी बेअरस्टोच्या साथीने सामना जिंकला.
इंग्लंडसमोर होते 125 धावांचे आव्हान
बांग्लादेश संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतल्याने मोठी धावसंख्या उभी करणे शक्य झाले नाही. मुशफिकर रहमानने सर्वाधिक 29 धावा केल्या. महमुद्दुल्लाहने 19 तर नरुल हसनने 16 धावा केल्या. नसिम अहमदने 19 धावा करीत अखेरीस थोडीफार लढाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर 5 फलंदाजांनी मात्र दोन आकडी धाव संख्याही गाठली नाही. अशा तऱ्हेने बांग्लादेश संघाने .124 धाव करुन इंग्लंडसमोर 125 धावांचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंड संघापुढे हे आव्हान सोपे दिसत असून आता तरी इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे.