दिवाळीच्या मूहूर्तावर टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामन्यात भारतीय टीमने दमदार विजय मिळवला आहे. फलंदाजीने मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत भारतीय संघाने अफगाणिस्तानच्या टीमसमोर 210 धावांचां डोंगर उभा केला. त्यानंतर उत्तम गोलंदाजीने अफगाणिस्तानला 144 धावांवर रोखत 66 धावांनी विजय मिळवला.
रोहित-राहुल जोडीची मोठी भागीदारी
पहिल्या दोन्ही सामन्यात दारुण पराभूत झालेला असल्याने आज पुन्हा ती पुनरावृत्ती होऊ नये या अपेक्षेने आज भारतीय टीमने खेळ केल्याचे दिसले. आधी पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर आज मात्र भारत आपल्या जुन्या रंगात परत आला. एका मोठ्या विजयाची नोंद भारतीय संघाने केली आहे. यावेळी रोहित-राहुल जोडीने उत्तम सलामी देत एक मोठी भागिदारी केली. ज्यानंतर शमी, आश्विन, बुमराह यांच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला कमी धावसंख्येत रोखलं.
भारतीय संघाची दमदार सुरुवात
भारतीय संघाच्या सलामीला आलेल्या के एल राहुल आणि रोहित शर्मा यांनी जोरदार फटकेबाजीला सुरूवात केली. दोन सामन्यात सलमीची जोडी यशस्वी झाली नव्हती. मात्र पहिल्यांदाच शतकी भागीदारी करीत या जोडीने कसर भरुन काढली आहे.
भारतीय संघाचा 142 धावा असताना रोहित शर्मा बाद झाला. त्याने 47 चेंडूत 74 धावा केल्या. या झुंझार खेळीत त्याने 3 षटकार व 8 चौकारांची आतषबाजी केली. के एल राहुलनेही साजेशी खेळी करीत 48 चेंडूत 69 धावा काढल्या. यात त्याने 2 षटकार व 6 चौकार ठोकले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंत व हार्दिक पांड्याने फटकेबाजी करीत संघाची धावसंख्या 200 पार केली. यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक 210 धावा भारतीय संघाने केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात उभारल्या आहेत.
अफगाणीस्तान संघासमोर 211 धावा करण्याचे कठीण आव्हान भारताने ठेवले आहे. भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारत आपला पहिला विजय साकारेल, परंतु मोठ्या फरकाने विजय मिळवण्याच्या दिशेने संघाने उत्तम पाऊल टाकले आहे.