नवी दिल्ली - बंगळुरुचा १७ वर्षीय यश अराध्या हा प्रतिष्ठित 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार' मिळालेला भारताचा पहिला मोटरस्पोर्ट स्टार बनला आहे. यशला बुधवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात भारताचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यशला हा पुरस्कार प्रदान केला. नऊ वर्षापासून यश रेसिंग ट्रॅकवर दमदार प्रदर्शन करत आहे. यशने आतापर्यंत १३ विजेतेपद जिंकली असून त्याला ६५ पोडियम फिनिश आणि १२ पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा -महिला कबड्डीपटूला केलेल्या मारहाणीप्रकरणी बंगाल वॉरियर्सचा प्रशिक्षक अटकेत!
या पुरस्कारान्वये वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. यशव्यतिरिक्त इतर ४९ विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महिला व बाल विकास मंत्रालयाने नियुक्त केलेल्या एलिट पॅनेलद्वारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. २६ जानेवारीला होणाऱ्या परेडदरम्यान हे विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधतील.
'हा पुरस्कार संपूर्ण मोटरस्पोर्ट समुदायासाठी सन्मान आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप विशेष असून अनेक तरुणांना चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा देईल', असे यशने सन्मान मिळाल्यानंतर म्हटले आहे.