नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि जागतिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन गौरव शर्मा यांना दुबईतील इंडो-अरब लीडर्स समिट पुरस्कारादरम्यान गौरवण्यात आले. शुक्रवारी रात्री झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात बजरंगला 'इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' तर, गौरवला 'व्हिजनरी लीडर ऑफ दी ईयर-स्पोर्ट्स' पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा -Hong Kong Open : उपांत्य फेरीत श्रीकांतचा पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात
'माझा सन्मान केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो, असे पुरस्कार खेळाडूला प्रेरणा देतात. मी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो आहे आणि आपल्या देशाचा गौरव करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन', असे बजरंगने पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हटले.
'व्हिजनरी लीडर ऑफ दी ईयर-स्पोर्ट्स'चा मानकरी गौरव शर्मानेही मत व्यक्त केले आहे. 'मी माझ्या भावना सांगू शकत नाही. हे खूप चांगले आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर मी भावूक झालो. पॉवरलिफ्टिंग हा एक असा खेळ आहे ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते, परंतु मला माझ्या यशाचा अभिमान आहे. मी माझ्या गुरूचे आभार मानतो', असे गौरवने म्हटले आहे.