नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगटने हरियाणा पोलीस दलातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. तिने १२ ऑगस्ट रोजी वडील महावीर फोगट यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच बबिताने १३ ऑगस्ट रोजी पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून दिला होता. दरम्यान, बबिता भाजपकडून आगामी निवडणूक लढू शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बबिता फोगटने राजीनामा देण्याचे कारण सांगितले की, 'मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षासोबत काम करायचे असेल तर आपण आपल्या इतर पदांचा राजीनामा द्यायला हवा. त्यामुळे मी माझा राजीनामा प्रशासनाकडे १३ ऑगस्ट रोजीच दिला होता.' भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बबिताने भारतीय जनता पक्षात सहभागी होऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा, अशा आशयाचे आवाहनात्मक ट्विट केले होते.