उलान-उदे (रशिया) - सहा वेळा जगज्जेती ठरलेली भारताची महिला बॉक्सर मेरी कोमचे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात मेरीला तुर्कीच्या बुसेनांज कारिकोग्लूकडून ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतासाठी तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मेरीच्या अपयशानंतर भारताचे गोल्ड जिंकण्याचे स्वप्न भारताची दुसरी बॉक्सर मंजू राणीने कायम ठेवले आहे. तिने ४८ किलो वजनी गटातून अंतिम फेरी गाठली आहे.
मंजू राणीने पहिल्यांदाच जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलंडच्या की सी रकसात हिचा ४-१ ने पराभव केला. या विजयासह तिने भारतासाठी आपले रौप्य पदक निश्चित केले आहे.