ईकॅटरिनबर्ग- भारताचा पुरुष बॉक्सर अमित पांघलला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अमितला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या एस. झोइरोव्हकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवाबरोबर त्याचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या झोइरोव्हने अमितचा ५-० ने एकतर्फी पराभव केला. दरम्यान, यंदाची विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा भारताच्या बॉक्सरपटूंसाठी महत्वाची ठरली. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. अमितने तर आपल्या कारकिर्दीमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला.
सामन्यात अमितने सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमितचे ठोसे योग्य ठिकाणी लागत नव्हते. उलट विरोधी बॉक्सर झोइरोव्हने मात्र अचुक ठोसे लगावले. दुसऱ्या राऊंडमध्ये अमित गडबडलेला दिसला. तेव्हा झोइरोव्हने संधी साधून गुणाची कमाई करत सामना जिंकला.