महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

World Athletics Championships : पारुल चौधरीनं मोडला राष्ट्रीय विक्रम, पुरुष रिले संघ ५ व्या स्थानी

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारतीय अ‍ॅथलेट्स दमदार कामगिरी करतायेत. भारताच्या पारुल चौधरीनं ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता गाठली. तर ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुषांचा संघ पाचव्या स्थानावर राहिला.

World Athletics Championships
जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 6:57 AM IST

Updated : Aug 28, 2023, 7:13 AM IST

बुडापेस्ट (हंगेरी) : बुडापेस्ट येथे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ सुरू आहे. रविवारी (२७ ऑगस्ट) झालेल्या ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत भारताच्या पारुल चौधरीनं ११वं स्थान पटकावलं. पारुलनं ९:१५.३१ अशी वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. या कामगिरीसह तिनं २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपला प्रवेश निश्चित केलायं.

अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी केवळ दुसरी भारतीय महिला : ब्रुनेईच्या विन्फ्रेड मुटाइल यावीनं ८:५४.२९ या वेळेसह सुवर्णपदक जिंकलं. केनियाच्या बीट्रिस चेपकोनं ८:५८.९८ या तिच्या सर्वोत्तम वेळेसह रौप्य आणि केनियाच्याच फेथ चेरोटिचनं ९:००.६९ अशी वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकलं. पारुल चौधरीने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचून आधीच इतिहास रचला होता. या स्पर्धेच्या ट्रॅक इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती केवळ दुसरी भारतीय महिला खेळाडू होती.

४x४०० मीटर रिले शर्यतीत भारत पाचव्या स्थानी : दुसरीकडे, जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मधील ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुषांचा संघ पाचव्या स्थानावर राहिला. मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने २:५९.९२ अशी वेळ नोंदवली. क्विन्सी हॉल, व्हर्नन नॉरवुड, जस्टिन रॉबिन्सन आणि राय बेंजामिनवॉन यांच्या अमेरिकेच्या संघाने २:५७.३१ वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. फ्रान्सनं २:५८.४५ वेळेसह रौप्य तर ग्रेट ब्रिटननं २:५८.७१ वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकलं.

रिले संघाची ऐतिहासिक कामगिरी : पात्रता शर्यतीत भारतीय रिले संघानं आशियाई विक्रम मोडत नवा रेकॉर्ड स्थापित केला होता. या आधी आशियाई विक्रम २ मिनिटे ५९.५१ सेकंदाचा होता. हा विक्रम जपानी संघाच्या नावावर होता. भारताच्या चौकडीने २:५९.०५ अशी वेळ नोंदवत हा विक्रम मोडीत काढला. तुम्ही जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सामन्यांचं थेट प्रक्षेपण Sports18 चॅनल वर पाहू शकता. याशिवाय मोबाईलवर Jio Cinema अ‍ॅप द्वारे तुम्ही या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

हे ही वाचा :

  1. Neeraj Chopra News : नीरज चोप्राची ऐतिहासक कामगिरी, जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुर्वणपदक मिळविणारा ठरला पहिला भारतीय
  2. Indian Women Blind Cricket : भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं वर्ल्ड गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक, पंतप्रधानांकडून कौतुक
Last Updated : Aug 28, 2023, 7:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details