सॅंटियागो (चिली) : यावर्षी चिली येथे होणाऱ्या महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023 साठी ड्रॉ पाडण्यात आले आहेत. भारताचा बेल्जियम, कॅनडा आणि जर्मनीसह 'क' गटात समावेश आहे. 29 नोव्हेंबर रोजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कॅनडाविरुद्ध भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
एकूण 16 संघ सहभागी : महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023, 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या संघांची प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट 16 महिला ज्युनियर संघांची ही स्पर्धा चिलीची राजधानी सॅंटियागो येथील नॅशनल स्टेडियमच्या नवीन मैदानावर खेळवली जाईल. एफआयएच हॉकी महिला ज्युनियर विश्वचषक चिली 2023 चा अधिकृत शुभारंभ गुरुवारी चिली ऑलिम्पिक समितीच्या मुख्यालयात झाला.
स्पर्धेतील गटांची विभागणी : गट 'अ' मध्ये ऑस्ट्रेलिया, चिली, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. तर 'ब' गटात अर्जेंटिना, दक्षिण कोरिया, स्पेन आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. 'ड' गटात इंग्लंड, जपान, न्यूझीलंड आणि अमेरिका यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कॅनडाचा सामना केल्यानंतर भारताचा दुसरा सामना 1 डिसेंबर रोजी जर्मनीशी होणार आहे.
भारताला मिळाला कठीण ड्रॉ : महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023 मध्ये भारत, जपान आणि दक्षिण कोरियासह आशियातील तीन संघ सहभागी होणार आहेत. भारताला या स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाला आहे. भारताला विजेतपद जिंकण्यासाठी त्याच्या गटात बेल्जियम, कॅनडा आणि जर्मनी या संघांशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
हे ही वाचा :
- Virat Kohli Net Worth: विराट कोहलीची वर्षभरात १ हजार कोटींहून अधिक कमाई, उत्पन्नाचे साधन जाणून व्हाल थक्क
- Sunil Chhetri Record : सुनील छेत्रीची हॅटट्रिक, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये बनला सर्वाधिक गोल करणारा चौथा खेळाडू
- Ishan Kishan : ईशान किशन ठरणार ऋषभ पंतचा पर्याय? वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी घेतली दुलीप ट्रॉफीमधून माघार