नवी दिल्ली Women Premier League 2024 : यंदाची महिला प्रीमियर लीग होम आणि अवे फॉरमॅटमध्ये खेळवली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही स्पर्धा 23 फेब्रुवारीपासून मुंबई आणि बंगळुरूमध्ये सुरू होईल. यंदा ही स्पर्धा मुंबई आणि बेंगळुरू इथं होणार आहे, तर मागील वेळी ती फक्त मुंबईतच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची पहिला हंगाम मुंबईत 4 ते 26 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता. त्यात मुंबई इंडियन्सनं ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव करुन पहिली ट्रॉफी जिंकली. मात्र, यावेळचे सामने अद्याप निश्चित झालेले नाहीत.
डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता : महिला क्रिकझोनच्या अहवालानुसार, स्पर्धा होम आणि अवे पद्धतीनं आयोजित केली जाईल. प्रत्येक संघ दुसर्या शहरात जाण्यापूर्वी एका शहरात आपले सामने पूर्ण करेल. अहवालानुसार, बोर्ड डिसेंबर 2023 मध्ये लिलाव आयोजित करेल. त्यात संघ त्यांच्या संघात खेळाडूंचा समावेश करू शकतील. बीसीसीआयनं (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) 19 ऑक्टोबर रोजी खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली. यात पाच WPL फ्रँचायझींनी 60 खेळाडूंना कायम ठेवले. तर 29 खेळाडूंना संघात निवडीची प्रतिक्षा आहे. यात भारताची स्टार ओपनिंग बॅट्समन स्मृती मानधना हिच्या नावाचाही समावेश आहे. गतवर्षी बंगळुरूसाठी ती फलंदाजी आणि कर्णधारपदात चांगली कामगिरी करू शकली नव्हती.