रांची Women Asian Champions Trophy 2023 Final : आशियाई महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी जपानचा 4-0 असा पराभव करत चमकदार ट्रॉफीसह सुवर्णपदकावर कब्जा केलाय. अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात भारतीय संघानं दडपण अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित केलं आणि शानदार विजय मिळवला. भारतासाठी संगीता कुमारीने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पहिला गोल केला. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत उभय संघांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये भारतानं 3 शानदार गोल करत जपानचा 4-0 असा पराभव केला.
भारताच्या समर्थनार्थ स्टेडियम प्रेक्षकांनी हाऊसफुल : हा सामना बघण्यासाठी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. भारतीय संघानंही आपल्या समर्थकांना निराश न करता शानदार खेळाचं प्रदर्शन करत जपानचा 4-0 असा पराभव केला. भारतीय संघानं जपानसारख्या बलाढ्य संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडून नेत्रदीपक विजय संपादन केलाय.
- पहिल्या क्वार्टरचा खेळ बरोबरीत : तत्पूर्वी, फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्यानं सामना सुमारे 1 तास उशिरानं सुरू झाला. खेळाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये जपानने भारतावर जोरदार हल्ला केला. पण भारताच्या भक्कम बचाव फळीनं तो हाणून पाडला. त्यामुळं पहिल्या क्वार्टरचा खेळ 0-0 असा बरोबरीत सुटला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा पहिला गोल : दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं शानदार गोल केला. भारताची स्टार खेळाडू संगीता कुमारी हिनं पहिला गोल करून रांचीच्या प्रेक्षकांना जल्लोष करण्याची संधी दिली. नवनीत कौरनं चेंडू पुढे करत नेहाकडे पास केला. नेहानं संगीताला तिच्या उजवीकडे धावताना पाहिलं आणि पास दिला. संगीतानं चेंडू थोड्या अंतरावर नेला आणि नंतर तो शानदारपणे गोलपोस्टमध्ये टाकला. याशिवाय या क्वार्टरमध्ये अन्य कोणताही गोल झाला नाही. हाफ टाईमपर्यंत भारत जपानपेक्षा 1-0 ने पुढे होता.
- तिसऱ्या तिमाहीचा खेळ : तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले. मात्र, दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. परिणामी भारतानं 1-0 अशी आघाडी घेऊन क्वार्टर संपवला.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारतानं केले 3 गोल : चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळाली. भारतानं या क्वार्टरची सुरुवात पेनल्टी कॉर्नरनं केली. पण, गोल करण्यात अपयश आलं. मात्र काही मिनिटांनंतर नेहानं अप्रतिम गोल करत भारताला सामन्यात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर जपाननं उत्कृष्ट प्रतिआक्रमण केलं. पण, भारतीय गोलकीपर आणि कर्णधार सविता पुनियानं त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर पूर्ण वेळेच्या काही मिनिटे आधी लालरेमसियामीने आणखी एक शानदार गोल करून भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. नंतर शेवटच्या काही मिनिटांत भारतानं आणखी एक गोल करत सामना 4-0 असा जिंकला.
हेही वाचा :
- Cleveland Championships : बार्टी-सँडर्सविरुद्ध सानिया - नादियाची उपांत्य फेरीत हार
- Virat Kohli Record : कोहलीची विश्वचषकात आणखी एक 'विराट' कामगिरी; रचला नवा इतिहास
- Virat Kohli Birthday : विराटची क्रिकेटच्या देवाशी बरोबरी; सँड आर्टिस्टकडून कोहलीला खास शुभेच्छा