चंडीगड - फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांच्या पार्थिवावर सेक्टर २५ परिसरात असलेल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाने ९१ वर्षीय महान खेळाडूला सलामी दिली. मिल्खा यांचा मुलगा आंतरराष्ट्रीय गोल्फपटू जीव मिल्खा सिंह यांनी फ्लाईंग सिखच्या पार्थिवाला अग्नी दिली.
ब्लेझर आणि लाल पगडी अशा आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये मिल्खा यांनी आपल्या आयुष्याची अखेरची रेस पूर्ण केली. त्यावेळी त्यांच्या हातात पत्नी निर्मल कौर यांचा फोटो होता. दोघेही एका वेगळ्या प्रवासाला सुरूवातासाठी निघाले आहेत. असेच काहीसे ते दृश्य होते.
मिल्खा यांच्या निधानाच्या ५ दिवसांआधी निर्मल कौर यांचं निधन
मिल्खा यांच्या निधनाच्या पाच दिवसाआधी निर्मल कौर यांचे देखील कोरोनाने निधन झाले. निर्मल कौर या मिल्खा यांच्या पत्नी होत्या. तसेच त्या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार देखील होत्या.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने मिल्खा यांच्या अंत्यसंस्कारादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिल्खा सिंह यांच्या हातात पत्नी निर्मल कौर यांचे छायाचित्र दिसून येत आहे. आपल्या लाडक्या पत्नी निर्मलजींकडे जाण्यासाठीच त्यांनी धाव घेतली, असे भावनिक कॅप्शन सेहवाग या फोटोला दिलं आहे.
मिल्खा सिंह यांच्याविषयी थोडक्यात...
मिल्खा सिंह यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. मिल्खा सिंह यांनी १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. त्यानंतर त्यांनी १९६२ मधील जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळामध्ये ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा -पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ ५ दिवसांत मिल्खासिंग यांचे निधन, आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार
हेही वाचा -भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार