मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आज देशात 'जनता कर्फ्यू' झाला. यात सायंकाळी पाच वाजता नागरिकांनी पाच मिनिटे गजर करत, आपल्याला सेवा देणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले. यामध्ये क्रीडा विश्वही मागे राहिलेले नाही. भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, कुस्तीपटू सुशील कुमार, महिला कुस्तीपटू दिव्या काकरा, टेबलटेनिसपटू मनिका बत्रा यांच्यासह भारतीय महिला हॉकी संघानेही गोष्टीला भन्नाट प्रतिसाद दिला.
सचिनने आपल्या घराबाहेर येऊन, कठीण प्रसंगात अविरत सेवा देणाऱ्यांचे आभार मानले. तसेच त्याने आम्ही देखील आमची जबाबदारी ओळखत या विषाणूशी असाच सामना करु, असे सांगत टाळ्या वाजवत कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरामधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आज सांयकाळी ५ वाजता देशवासियांनी टाळ्या-थाळ्या अन् घंटेचा नाद करत कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त केले. जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही ४०० हून अधिक जणांना याची बाधा झाली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे. दरम्यान, महाराष्ट्राने कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे आणि लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत राज्यात १४४ कलम लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व गोष्टींची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.