मॉस्को -ऑलिम्पिकमध्ये नेहमीच अव्वल संघांमध्ये असणाऱ्या रशियाला यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकपूर्वी मोठा धक्का बसणार आहे. रशियावर ४ वर्षासाठी सर्व खेळांवर बंदी घातली जाऊ शकते. जागतिक अँटी-डोपिंग एजन्सी (वाडा) कडून ही बंदी घालण्यात येऊ शकते.
हेही वाचा -मास्टर ब्लास्टरच्या ट्विटनंतर, 'ते' अकाऊंट झाले गायब!
प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या आकडेवारीत फेरफार केल्याप्रकरणी वाडाच्या समितीने मॉस्कोवर आरोप लावला आहे. वाडा ही बंदीची शिफारस मान्य करेल असे मत रशियाचे अँटी-डोपिंगप्रमुख युरी गानस यांनी मांडले आहे. जर ही बंदीची शिक्षा अंमलात आली तर, रशिया आगामी दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
१९९६ पासून सलग ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या रशियाने ५४६ ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. युरी म्हणाले की, 'आम्ही बाहेर जाणार आहोत, पुढील चार वर्षे आम्ही बाहेर आहोत. चार वर्षे हा बराच काळ आहे. रशियाला तातडीने नवीन क्रीडा व्यवस्थापनाची आवश्यकता होती आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.'
'प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मी राष्ट्रपतींनी यात सक्रिय भूमिका बजावण्याची वाट पहात आहे. येथे खेळामध्ये बरीच समस्या आहेत, परंतु सर्वात कठीण आणि दुःखद बाब म्हणजे आमच्या खेळाडूंना आमच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेल्या या वाईट कामाचा फटका सहन करावा लागणार आहे', असेही युरी यांनी म्हटले आहे.