नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या घसरत्या शेअरमुळे अदानी जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत 18 व्या क्रमांकावर आले आहेत. 24 जानेवारीला हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठा परिणाम दिसून आला. अहवालापूर्वी अदानी जगातील टॉप 3 श्रीमंतांच्या यादीत येत होते. आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग अदानींच्या समर्थनार्थ समोर आला. ट्विट करताना सेहवागने नाव न घेता हिंडेनबर्गवर निशाणा साधला आहे.
वीरेंद्र सेहवागचे अदानी यांच्या समर्थनार्थ ट्विट :वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, 'भारताची प्रगती गोर्यांना सहन होत नाही. भारतीय बाजारपेठेतील हिटजॉब हे सुनियोजित कट असल्याचे दिसते. तुम्ही कितीही प्रयत्न कराल, पण नेहमीप्रमाणेच भारत मजबूत होईल. विशेष म्हणजे, वीरेंद्र सेहवाग लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये अदानी ग्रुपच्या गुजरात जायंट्स संघाचा कर्णधार आहे. अदानींच्या समर्थनार्थ सेहवागचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. सेहवागच्या या ट्विटवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.
पाहुया नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण : 24 जानेवारी रोजी आलेल्या हिंडेनबर्ग अहवालापासून अदानी समूहाला एकापाठोपाठ एक धक्का बसत आहे. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. बीएसईवर अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी विल्मार यांचे समभाग पाच टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करीत आहेत. त्याच वेळी, आता अदानी ट्रान्समिशन 10 टक्क्यांनी खाली आले आहे. याशिवाय अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 501.50 रुपयांवर व्यवहार करीत होते. याशिवाय अदानी समूहाच्या इतर कंपन्या, अंबुजा सिमेंट्स ३.२८ टक्क्यांनी, एसीसी ०.८२ टक्क्यांनी आणि एनडीटीव्ही ४.९८ टक्क्यांनी घसरले.
अदानी समूहाचा 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द :अदानी समूहाला 20 हजार कोटींचा पहिला एफपीओ रद्द करावा लागला. त्यानंतर 10 अब्ज रुपयांचे ($122 दशलक्ष) रोखेही रद्द करण्यात आले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बाजारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कंपनीने बाँड मागे घेण्याचा निर्णय घेतला. हिंडेनबर्ग अहवालानंतर कंपनीचे बाजारमूल्य अर्ध्याहून कमी राहिले आहे. हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाला सुमारे $118 बिलियनचे नुकसान झाले आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानींच्या विरोधात काॅंग्रेसची निदर्शने :हिंडनबर्गे अहवाल आल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांची चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेस आज देशभर आंदोलन करीत आहे. राज्यातही विविध ठिकाणी गौतम अदानींच्या विरोधात कॉंग्रेसच्यावतीने आंदोलने करण्यात आली. गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर अमेरिकन संशोधन कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल आला आणि अदानींच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली. त्या दिवसापासून अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले आहेत. या अहवालानंतर अदानी समूहाच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अदानींच्या गैरव्यवहाराविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली असून राज्यात विविध ठिकाणी कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आली.