मुंबई- विश्व अजिंक्यपद स्पर्धेची कांस्यपदक विजेती विनेश फोगाटची सलग दुसऱ्या वर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार आहे. तर रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केलेला आहे. साक्षी यापूर्वीच खेलरत्न पुरस्काराची मानकरी ठरली आहे. महाराष्ट्राच्या राहुल आवारे याने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) सहायक सचिव विनोद तोमर यांनी याविषयी सांगितलं की, 'विनेशचे नाव आम्ही खेलरत्नसाठी पाठवणार आहोत. ती प्रबळ दावेदार असेल, पण अर्जुन पुरस्काराच्या शिफारसीसाठी जास्त अर्ज अजून आलेले नाहीत, यामुळे आम्ही अद्याप नावांचा विचार केलेला नाही. नावांची शिफारस करण्यासाठीची मुदत ३ जूनपर्यंत आहे.'
विनेश गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. तिने जकार्तामध्ये आशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच २०१९ मध्ये नूर सुल्तानमध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला मल्ल ठरली. विनेशला मागील वर्षी खेलरत्न पुरस्कार पटकवता आला नाही. कारण, तिचा सहकारी मल्ल बजरंग पुनिया या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.