कझाकिस्तान - आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली विनेश फोगटने विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयारंभ केला. ५३ किलोच्या वजनी गटाच्या पहिल्या सामन्यात विनेशने स्वीडनच्या सोफिया मॅटसनला १३-० ने हरवले. सोफिया ही रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची पदक विजेती खेळाडू आहे.
हेही वाचा -पाक खेळाडूंचे गोडधोड व बिर्याणी बंद, प्रशिक्षक मिसबाहने चालू केले नवीन 'डाएट'
सोफियाविरुद्ध विनेशने आरामात विजय मिळवला. तिने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सोफियावर दडपण वाढवले. पंचांनी तांत्रिक सुपरयॉरटीच्या आधारावर विनेशला विजेती घोषित केले. २०१६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सोफियाने कांस्यपदक पटकावले होते.
विनेशला पुढच्या सामन्यात जपानच्या मायू मुकाइदाशी लढत द्यावी लागणार आहे. मुकाइदाशीने मागील वर्षी बुडापेस्ट येथे झालेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. ५० किलोनंतर, विनेश आता ५३ किलो वजनी गटात खेळते आहे. तिने यासर डागु, पोलंड ओपन आणि स्पेन ओपनमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेला नूर सुल्तान येथे सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी ग्रीको-रोमन स्पर्धेतील चार सामन्यात भारताचा पराभव झाला. हरप्रीत सिंह (८२ किलो), सागर (६३ किलो) आणि मनजीत (५५ किलो) यांना सामन्यांत एकही गुण मिळवता आला नाही. केवळ योगेश (७२ किलो) याने अमेरिकन प्रतिस्पर्धी रेमंड अॅथोनी बंकरला आव्हान दिले. मात्र, त्याचाही अखेर ५-६ असा पराभव झाला.