नवी दिल्ली - भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट १ सप्टेंबरपासून लखनऊमध्ये सुरू होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती शिबिरात भाग घेणार नाही. त्यामुळे तिने हरियाणाच्या भिवानी येथे तिच्या घरी सरावाला सुरूवात केली आहे. महिला गटात विनेश फोगाट ही एकमेव महिला कुस्तीपटू आहे, जिने आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट जिंकले आहे.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (डब्ल्यूएफआय) भारतीय क्रीडा प्राधिकरणास (SAI) पुढील महिन्यापासून राष्ट्रीय कुस्ती शिबिर आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, अनेक कुस्तीपटू या निर्णयाच्या विरोधात आहेत. एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू विनेशने फेडरेशनला एकटे प्रशिक्षण घेण्यास विनंती केली आहे.
विनेश म्हणाली, "हो, मी या शिबिरात भाग घेणार नाही. मी फेडरेशनला त्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी मला यासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत आणि मला कोणताही धोका घ्यायचा नाही. म्हणूनच यावेळी मी शिबिरातून माघार घेण्याचा विचार केला आहे."
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक कोटा जिंकणार्या बजरंग पुनिया आणि महिला कुस्तीपटू पूजा धंदा यांनी शिबिरामध्ये सहभाग घेणार असल्याची माहिती दिली आहे. भारतीय कुस्तीगीरांसाठी राष्ट्रीय शिबीर पुढील महिन्यात १ सप्टेंबरपासून सुरू होईल. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) शनिवारी याची घोषणा केली. हे शिबीर ३० सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. पुरुष कुस्तीपटूंसाठीचे शिबीर हरियाणाच्या सोनीपत येथे तर महिलांचे शिबीर लखनऊ येथे आयोजित केले जाईल.
आठ किलो वजनी गटातील एकूण २६ पुरुष कुस्तीपटू सोनीपत येथील शिबिरात सहभागी होतील. यामध्ये पाच फ्री स्टाईल (५७, ६५, ७४, ८६, १२५ किलो) आणि तीन ग्रीको रोमन्स (६०, ७७, ८७ किलो) समाविष्ट आहेत. त्यांच्यासमवेत सहा क्रीडा कर्मचारीही असतील. त्याचबरोबर महिलांच्या शिबिरात एकूण १५ महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. लखनौच्या शिबिरात पाच (६०, ७७, ८७ किलो) समाविष्ट आहेत. त्यांच्यासमवेत चार क्रीडा कर्मचारी असतील.