लखनौ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला. इकाना स्टेडियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल आनंदीबेन पटेल या देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खेळाडूंना रोख बक्षिसांचे चेक दिले.
उत्तर प्रदेश सरकारने सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला 2 कोटी रुपयांचा चेक देत सन्मान केला. तर रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी दीड-दीड कोटी आणि कास्य पदक विजेत्यांना 1-1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले.
कास्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघातील सर्व खेळाडूंना उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी 1-1 कोटी रुपये दिले. तर टोकियोत सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी 50-50 लाखांचे बक्षिस दिले.
उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री उपेंद्र तिवारी यांनी सांगितलं की, आज उत्तर प्रदेशसाठी उत्साहाचा दिवस आहे. हा दिवस ऐतिहासिक दिवस असून देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा आज सन्मान केला जात आहे.