टोकियो - सुमित अंतिलने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. सुमितने पुरूष भालाफेक एफ 64 स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवत ही कामगिरी केली. भारताने 2016 मध्ये चार पदक जिंकले होते. तर सद्या सुरू असलेल्या टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 7 पदके जिंकली आहेत. हरियाणाच्या सोनीपत येथे राहणाऱ्या 23 वर्षीय सुमित अंतिलने 2015 मध्ये दुचाकी अपघातात आपला पाय गमावला. आज त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात 68.55 मीटर लांब भाला फेकत नव्या विश्वविक्रमासह सुवर्ण पदक जिंकले.
सुवर्ण पदक जिंकल्यानंतर सुमित अंतिलवर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुमित अंतिलचे अभिनंदन केले आहे. या संदर्भात मोदी यांनी ट्विट केले आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, आपले अॅथलिट पॅराऑलिम्पिकमध्ये चमकत आहेत. पॅराऑलिम्पिकमध्ये सुमित अंतिलच्या रेकॉर्ड तोड प्रदर्शनावर देशाला अभिमान आहे. सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल सुमितचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील सुमित अंतिलचे अभिनंदन केले असून त्यांनी, आजचा दिवस अविश्वरणीय असल्याचे म्हटलं आहे. याशिवाय हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी देखील सुमितचे कौतुक केले. ते म्हणतात की, हरियाणाच्या पोराने पॅराऑलिम्पिकमध्ये भाला रोवला. सुमित अंतिलने पॅराऑलिम्पिकमध्ये विश्वविक्रमी रेकॉर्ड करत सुवर्ण पदक जिंकत त्याने हरियाणासोबत संपूर्ण देशातील नागरिकांची मने जिंकली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन.