मुंबई - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने इतिहास रचला. तिने महिला एकेरी क्लास 4 मध्ये रौप्य पदक जिंकले. भारताचे टोकियो पॅराऑलिम्पिकमधील हे पहिले पदक आहे. भाविनाबेन पटेलच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केलं.
भाविनाबेन पटेलचा अंतिम सामन्यात जगातील नंबर वन चीनी खेळाडू झाउ यिंग हिने 3-0 ने पराभव केला. यामुळे भाविनाबेन पटेलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पण ती पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची दुसरी महिला ठरली. याआधी दीपा मलिक हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक खेळात रौप्य पदक जिंकले होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं कौतुक
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत भाविनाबेन पटेलचे अभिनंदन केले. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, भाविनाबेन पटेलने पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत भारतीय संघ आणि क्रीडा प्रेमींना प्रेरित केले आहे. खेळाप्रती बांधिलकी आणि कौशल्याने तिने देशाचे गौरव वाढवला. या कामगिरीबद्दल मी भाविनाबेन पटेलचे अभिनंदन करतो.