टोकियो - प्रमोद भगत आणि पलक कोहली या भारतीय मिश्र दुहेरी जोडीला टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. बॅडमिंटन खेळाच्या ग्रुप बी मध्ये फ्रान्सच्या लुकास माजूर आणि फॉस्टीस नोएल या दुसऱ्या मानांकित जोडीने भारतीय जोडीचा पराभव केला.
प्रमोद भगत आणि पलक कोहली एसएल3-एसयू 5 वर्गात खेळत होते. त्यांना फ्रान्सच्या जोडीकडून 43 मिनिटात 9-21 21-15 19-21 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
भारतीय जोडीने सामन्यात खराब सुरूवात केली. पहिल्या ब्रेकपर्यंत भारतीय जोडी 5-11 अशा पिछाडीवर होती. अखेरपर्यंत हाच दबदबा राखत फ्रान्सच्या जोडीने हा गेम सहज जिंकला. तेव्हा भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले आणि हा गेम 21-15 अशा फरकाने जिंकत सामना बरोबरीत आणला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये फ्रान्सच्या जोडीने 13-9 अशी बढत घेतली होती. तेव्हा भगत-पलक जोडीने शानदार वापसी करत हा गेम 15-14 अशा स्थितीत आणला. त्यानंतर फ्रान्सच्या जोडीने आपला अनुभव पणाला लावत मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत तिसरा गेम 21-19 अशा फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला.