टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारतीय पॅराअॅथलिट राकेश कुमारला संघर्षपूर्ण सामन्यात पराभव पत्कारावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत राकेश कुमारचा सामना चीनच्या अल झिनलियांग याच्याशी झाला. या सामन्यात राकेशचा 143-145 अशा थोड्या फरकाने पराभव झाला. राकेशचे या पराभवासह टोकियो पॅराऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.
पहिल्या फेरीत राकेश कुमार 29-30 अशा पिछाडीवर होता. चिनी तिरंदाजाच्या दबावात देखील राकेशने चांगला खेळ केला. त्याने चिनी खेळाडूला कडवी झुंज दिली. तिसऱ्या आणि पाचव्या फेरीमध्ये त्याने प्रत्येकी 29-29 पाँईट घेतले. तर दुसऱ्या आणि चौथ्या फेरीत त्याला प्रत्येकी 28-28 पाँईट घेता आले. याचा फायदा चिनी खेळाडूने उचलला.
एलिमिनेशन राउंडमध्ये राकेश कुमारची शानदार वापसी
दुसरीकडे चिनी खेळाडूने कामगिरीत सातत्य दाखवले. पण तिसऱ्या फेरीत तो 28 पाँईट घेऊ शकला. याचा फायदा भारतीय खेळाडू राकेश कुमारला उचलता आला नाही. दरम्यान, राकेशने याआधी एलिमिनेशन राउंडमध्ये स्लोवाकियाच्या मारियान मारेसाक याच्याविरुद्ध शानदार वापसी करत विजय मिळवला होता.
एलिमिनेशन राउंडमध्ये पहिल्या दोन फेरीत पिछाडीवर असताना देखील राकेश कुमारने शानदार वापसी करत 140-137 अशा फरकाने सामना जिंकला होता आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. आता तिरंदाजीत भारताची आशा हरविंदर सिंह आणि विवेक चिकारा यांच्यावर आहे. ते पुरूष वैयक्तिक रिकर्व गटात शुक्रवारी खेळणार आहेत.
हेही वाचा -Tokyo Paralympics: मनिष, सिंगराज अंतिम फेरीत; भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या
हेही वाचा -Tokyo Paralympics : उंच उडीत मरियप्पन थंगवेलूने रौप्य आणि शरद कुमारने जिंकलं कास्य पदक