टोकियो -टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत इतिहास रचला. यंदाच्या या स्पर्धेत भारताने सर्वश्रेष्ठ कामगिरीसह 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कास्य पदकांसह पदकतालिकेत 24वे स्थान पटकावले. भारतीय खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 8 पदके जिंकली. तर शुटिंगमध्ये 5, बॅडमिंटनमध्ये 4, टेबल टेनिस आणि तिरंदाजीत प्रत्येक 1-1 पदक जिंकले. पॅराऑलिम्पिक खेळाच्या इतिहासात भारताने पहिल्यांदा दुहेरी आकड्यात पदक जिंकले आहेत. याआधी भारताने सर्वश्रेष्ठ कामगिरी 2016 रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये केली होती. या स्पर्धेत भारताच्या नावे 2 सुवर्ण पदकासह एकूण 4 पदके होती.
पॅराऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात 1960 मध्ये झाली. परंतु भारताने 1968 च्या पॅराऑलिम्पिकमध्ये प्रथम भाग घेतला. टोकियो हे भारताचे 12वे पॅराऑलिम्पिक आहे. याआधीच्या सर्व पॅराऑलिम्पिकमध्ये मिळून भारताने चार सुवर्णसह एकूण 12 पदके जिंकली होती.
आता टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने 19 पदके जिंकली आहेत. यासह पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदक संख्या 31 अशी झाली आहे. यात 9 सुवर्ण 12 रौप्य आणि 10 कास्य पदकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 18 पदके ही भारताने अॅथलेटिक्समध्ये मिळवली आहेत.
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारे खेळाडू
अवनी लेखरा, प्रमोद भगत, कृष्णा नागर, सुमित अंतिल आणि मनिष नरवाल.