टोकियो -भारतीय अॅथलिट अरविंद टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरूष गोळाफेक एफ 35 स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिला. त्याला विनापदक परतावे लागले.
पहिलेच पॅराऑलिम्पिक स्पर्धा खेळत असलेला 28 वर्षीय अरविंद, आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये सर्वश्रेष्ठ 13.48 मीटर लांब गोळा फेकू शकला. या स्पर्धेत उज्बेकिस्तानच्या खुसनिद्दीन नोरबेकोव याने सुवर्ण पदक जिंकले. त्याने 16.13 मीटरचा थ्रो केला. तर अर्जेंटिनाचा इमॅनुअल उरा याने 15.90 मीटरच्या थ्रो सह रौप्य पदकाला गवसणी घातली. चीनचा फु जिनहान 15.41 मीटरच्या थ्रोसह कास्य पदकाचा मानकरी ठरला.
भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंची दमदार कामगिरी
जगातील अव्वल पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत याने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली. त्याने पुरूष एकेरीच्या ग्रुप ए मधील दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या ओलोक्सांद्रे चिरकोव याचा पराभव केला. भगतसोबत भारताचे इतर पॅरा बॅडमिंटनपटू सुहास यतिराज, तरुण ढिल्लो आणि कृष्णा नागर यांनी पुरूष एकेरीत विजयी सुरूवात केली.