टोकियो - कुस्तीपटू रवी कुमार दहियाने इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी कुमार दाहिया अंतिम फेरीत पोहोचला आहे. 57 किलो वजनी गटात रवी कुमार दहिया याने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायव नूरिस्लाम याला आस्मान दाखवत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह रवी कुमार दहियाचे रौप्य पदक निश्चित झालं आहे.
रवी कुमार दहिया उपांत्य फेरीच्या सामन्यात 5-9 ने पिछाडीवर होता. पण त्याच्याकडे पुनरागमनाची संधी होती. त्याने ही संधी साधत सामन्यात पुनरागमन केलं. कुस्तीमध्ये प्रत्येक सेंकदागणिक सामन्याचे चित्र पालटते. अशी कमाल रवी कुमार दहिया याने केली आणि कझाकिस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव केला.
भारताचे चौथे पदक
भारताचे हे चौथे पदक आहे. याआधी मिराबाई चानू याने रौप्य पदक जिंकलं आहे. तर पी. व्ही. सिंधू आणि महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. आता रवी कुमार दहियाने अंतिम फेरी गाठत भारताचे चौथे पदक निश्चित केले.
रवी कुमार दहिया याने जागतिक कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला होता. रवीने जागतिक कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्व विजेता आणि 2017 चा आशियाई चॅम्पियन जपानचा यूकी ताकाहाशी यांचा पराभव केला होता. रवीने हा सामना 6-1 ने जिंकत उपांत्य फेरी गाठली होती. पण त्याला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला होता.
हेही वाचा -Tokyo Olympics : भालाफेकपटू शिवपाल सिंहचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात
हेही वाचा -Tokyo Olympic : भारताला तिसरं पदक; लवलिनाने जिंकलं कांस्य पदक