टोकियो - भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूने पदक जिंकावी, अशी इच्छा मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा नीरज चोप्रा याने पूर्ण केली. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. तर 2008 नंतर म्हणजेच 13 वर्षांनंतर भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. 2008 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने वैयक्तिक गटात सुवर्ण पदक जिंकले होते.
1900 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 200 मीटर आणि 400 मीटर अडथळा शर्यतीत नॉर्मन प्रिचर्ड यांनी पदक जिंकले होते. त्यावेळी भारत स्वतंत्र झाला नव्हता. ते पदक आजही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारताच्या नावावरच नोंदवले आहे. पण, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या माहितीनुसार, प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर भारतीय खेळाडू अॅथलिटमध्ये पदक जिंकण्यानंतर अपयशी ठरले.
भारताचे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना 1964 ऑलिम्पिकमध्ये पदकाला हुकलावणी दिली. तर भारताची महिला धावपटू पी टी उषा १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकता जिंकता राहिली. यामुळे मिल्खा सिंग यांची इच्छा होती की, भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात पदक जिंकावे. आज नीरजने दिवंगत मिल्खा सिंग यांची ती अखेरची इच्छा पूर्ण केली आहे.