टोकियो - भारताचा मराठमोळा तिरंदाज प्रविण जाधवने पुरूष तिरंदाजी स्पर्धेच्या एकेरी गटात रशियाच्या गलसान बझारझापोव्हला धक्का दिला. गलसान जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. प्रविणने अशा मातब्बर खेळाडूला पराभूत केल्याने भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या. परंतु, राउंड 16 च्या फेरीत प्रविणला पराभव पत्कारावा लागला.
प्रविण जाधवने गलसानला पराभूत करण्याची किमया पात्रता फेरीमध्ये साधली. त्याने गलसानचा 6-0 ने एकतर्फा पराभव केला. पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्याला किमान दोन विजय आवश्यक होते. मात्र अंतिम सोळा जणांच्या फेरीत प्रविणचा अमेरिकेच्या तिरंदाजाने पराभव केला आणि त्याचे वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
अंतिम 16 फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसन याने प्रविणला पराभवाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ब्रॅडी एलिसनने सामना ६-० ने सहज खिशात घातला.