टोकियो - भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाचे विदेशी प्रशिक्षक मोराड गैड्रोव्ह यांची टोकियो ऑलिम्पिकमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मोराड यांच्यावर रेफरीवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
दीपक पुनियाचा सॅम मरिनोचा कुस्तीपटू मायलेस नज्म अमीन याच्याकडून 2-4 ने पराभव झाला. या सामन्यात दीपक 2-1 ने पुढे होता. पण अखेरच्या 10 सेंकदात मायलेस नज्म अमीने याने डाव टाकत तीन गुण घेतले आणि विजयी ठरला. दीपकने या सामन्यात शानदार बचाव केला. परंतु अखेरची काही सेंकद निर्णायक ठरली आणि त्याचा पराभव झाला.
दीपकच्या या सामन्यानंतर त्याचे प्रशिक्षक मोराड गैड्रोव्ह हे रेफरीच्या रुममध्ये गेले आणि त्यांनी रेफरीवर हल्ला केला. जागतिक कुस्ती संघटनेने याप्रकरणाची माहिती तात्काळ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला दिली. तेव्हा शुक्रवारी मोराड यांना शिस्तभंगाच्या कारवाईच्या सुनावणीसाठी बोलवण्यात आले. यावेळी भारतीय कुस्ती महासंघाला देखील यात बोलावलं होतं.