टोकियो - भारतीय पुरूष बॉक्सर सतीश कुमारचे ऑलिम्पिकधील पदार्पण दमदार राहिले. सतीशने 91 किलो वजनी गटात जमैकाच्या रिकार्डो ब्राउन याचा पराभव केला. या विजयासह सतीश उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. दोन्ही खेळाडूचे हे पहिलेच ऑलिम्पिक असून यात सतीशने ब्राउनचा 4-1 ने पराभव केला.
दोन वेळा आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत सतीशने कांस्य पदक जिंकले आहे. त्याने आजच्या सामन्यात ब्राउनच्या खराब फुटवर्कचा फायदा घेतला. या सामन्यात सतीशच्या कपाळाला दुखापत देखील झाली. यात त्याच्या जखमेतून रक्त वाहू लागलं होतं. तरी देखील त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत केलं.
राष्ट्रकूल स्पर्धा 2018 चा रौप्य पदक विजेता सतीश कुमारने डाव्या हाताने पंच मारत, ब्राउनला चूका करण्यास भाग पाडलं. ब्राउन एकही दमदार पंच मारू शकला नाही. दरम्यान, जमैकाकडून 1996 नंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला ब्राउन पहिला बॉक्सर आहे. तो उद्धाटन सोहळ्यात जमैकाचा ध्वजवाहक होता.