महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 3, 2021, 4:53 PM IST

ETV Bharat / sports

ऑलिम्पिक पात्र खेळाडू प्रवीण जाधववर बेघर होण्याची वेळ; द्यावं लागतयं कलहाला तोंड

टोकियो ऑलिम्पिकमध्ये 'आर्चरी' (तिरंदाजी) क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधवला घर बांधकामावरून शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे. चार गुंठे जागेवरून सुरू झालेला वाद प्रशासनापर्यंत पोहोचला आहे.

Tokyo Olympics: Anxious Calls From "Threatened" Parents Greet Archer Pravin Jadhav On Return From Tokyo
ऑलिम्पिक पात्र खेळाडू प्रवीण जाधववर बेघर होण्याची वेळ; द्यावं लागतयं कलहाला तोंड

सातारा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये 'आर्चरी' (तिरंदाजी) क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधवला घर बांधकामावरून शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे. चार गुंठे जागेवरून सुरू झालेला वाद प्रशासनापर्यंत पोहोचला आहे. प्रांताधिकार्‍यांनी घर बांधायला जागा दिली असताना त्यात समाधानाने राहता येत नसेल तर गावात राहून तरी काय करायचं? शासन जागा देईल त्या गावात जाऊन राहायची आमची तयारी आहे, असा गाव सोडण्याचा पवित्रा प्रवीणचे वडील रमेश एकनाथ जाधव (रा. सरडे ता. फलटण) यांनी घेतला आहे.

बांधकामाला शेजाऱ्यांचा विरोध
फलटणपासून साधारण 16 किलोमीटर अंतरावर असलेले सरडे हे प्रवीणचे गाव. या गावात तो वाढला, शिकला, मोठा झाला. प्रवीणचे आई-वडील आजही सरडे गावात मजुरी करतात. जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेमधील 'आर्चरी' या क्रीडा प्रकारासाठी भारतीय संघात सरडे गावचा सुपुत्र प्रवीण जाधव यांची निवड झाली होती. घरी आई-वडील, चुलती व चुलत भाऊ असे चार जणांचे कुटुंब दोन खोल्यांमध्ये राहते. स्वतःचे घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना 84 गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिले. त्या ठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाचा विरोध आहे. या विरोधातून काल सोमवारी दोन्ही कुटुंबात वाद झाला.

ऑलिम्पिक पात्र खेळाडू प्रवीण जाधववर बेघर होण्याची वेळ
प्रांतांनी जागा आखून दिली
या वादासंदर्भात प्रवीणचे वडील रमेश जाधव म्हणाले, फलटणच्या प्रांताधिकार्‍यांनी आम्हाला घर बांधण्यासाठी जागा मोजून दिली आहे. शेती महामंडळाच्या 84 गुंठे शिल्लक क्षेत्रातील जागा आम्हाला मिळाली. तरी शेजारचे एक कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे, असे सांगून बांधकामात अडथळा आणत आहे.
जेसीबीने घर पाडण्याची धमकी
सध्याचे दोन खोल्यांचे घर जेसीबीने पाडू अशी धमकीही त्या कुटुंबीयांनी दिली आहे. आम्हीं पुरुष मंडळी गुराढोरांच्या मागे घराबाहेर पडल्यानंतर घरातील महिलांना काही धोका झाला तर कोण जबाबदार? गावातून सहकार्य होणार नसेल तर आम्हीं दुसर्‍या गावात घर बांधून राहू, असे रमेश जाधव यांनी सांगितले.
त्यापेक्षा दुसरीकडे जाऊन राहू
टोकियोवरून प्रवीण दिल्लीत आला आहे. कालच त्याचा फोन झाला. 'गावात आपल्याला संरक्षण नसेल तर त्या गावात राहून, गावचे नाव लावून करायचं काय? त्यापेक्षा दुसऱ्या गावात घर बांधून राहू' असं प्रवीण म्हणाल्याचे रमेश जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
आत्मदहनाचा इशारा
प्रवीण जाधव सारख्या ऑलिम्पिक खेळाडूच्या कुटुंबावर अन्याय होत असेल आणि त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करणार असेल तर ही निंदनीय बाब आहे. एका जागतिक दर्जाच्या खेळाडूच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी दमदाटी, जीवे मारण्याची धमकी असे प्रकार सहन करावे लागत आहेत. याबाबत प्रांत अधिकारी तसेच फलटणच्या पोलिसांनाही कळविण्यात आले आहे. या प्रश्नी तोडगा न निघाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा सरडे गावचे माजी सरपंच रामभाऊ शेंडगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवीणला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. आज त्याच्या कुटुंबियांना राहत्या घरासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. प्रवीण जाधवचे आजोबा व आजी शेती महामंडळात नोकरीला होते. त्यांना फंडाची रक्कम मिळाली नाही. त्याबद्दल तत्कालीन अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या शिल्लक जागेपैकी सरडे येथील काही जागा राहण्यासाठी दिल्याचे रमेश जाधव यांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details