टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय तलवारबाज सीए भवानी देवीचे, आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. पहिल्या फेरीत दमदार विजय मिळवणारी भवानी देवी दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या मॅनॉन ब्रुनेटकडून पराभूत झाली. मॅनॉनने हा सामना 15-7 अशा फरकाने जिंकला. भवानी देवीने पहिल्या सामन्यात ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने धुव्वा उडवला होता. विशेष म्हणजे भवानी देवीने हा फक्त सहा मिनिटे १४ सेकंदांमध्ये जिंकला.
दरम्यान, दुसऱ्या फेरीतील पराभवानंतर भवानी देवी निराश झाली आणि तिने देशवासियांची माफी मागितली. भवानी देवीने एक ट्विट केलं आहे. त्यात ती म्हणते, 'हे खूप उत्साही आणि भावूक होतं. मी नादियाविरुद्धच्या सामना 15-3 अशा फरकाने जिंकत ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरले. पण दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मॅनॉन ब्रुनेटकडून 7-15 ने मी पराभूत झाले. पण मी माझं सर्वश्रेष्ठ दिलं. तरी देखील मी जिंकू शकले नाही. मला माफ करा.'