टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये चीनच्या महिला स्विमिंग संघाने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यांनी हा कारनामा फ्री-स्टाईल स्विमिंगच्या 4x200 मीटर प्रकारात केला. दरम्यान, या प्रकारात मागील 25 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचे जलतरणपटूंचा दबदबा होता. परंतु 1996 नंतर त्यांचे पहिल्यांदा सुवर्णपदक हुकले आहे. चीनने विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
महिला फ्री स्टाईल 4x200 प्रकारात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने सुवर्ण पदक जिंकण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु त्यांना यात यश आलं नाही. चीनच्या खेळाडूंनी 7 मिनिट 40.33 सेंकदाच्या वेळेसह विश्वविक्रम नोंदवत सुवर्ण पदकावर आपला दावा पक्का केला. या प्रकारात अमेरिका 7 मिनिट 40.73 सेंकदाच्या वेळेसह रौप्य पदकाचा मानकरी ठरला. ऑस्ट्रेलियाला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने यासाठी 7 मिनिट 41.29 सेंकदाचा वेळ घेतला.
स्विमिंगमध्ये 4x200 मीटर शर्यतीत मागील विश्वविक्रम 7.41.50 होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2019 मध्ये हा विश्वविक्रम केला होता. परंतु चीनने हा विश्वविक्रम मोडीत काढत सामना जिंकला.