टोकियो - पुढच्या वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा शक्य असल्यास पुन्हा स्थगित करू, असे मत टोकियो ऑलिम्पिकच्या क्रीडा समितीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्याने दिले आहे. टोकियो ऑलिम्पिक दुसऱ्यांदा तहकूब करण्याबाबत एखाद्या अधिकाऱ्याने बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार होते, परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
कार्यकारी मंडळाचे सदस्य हरियुकी ताकाहाशी म्हणाले, ''जर ही स्पर्धा रद्द झाली तर जपान आणि जगाच्या अर्थकारणावर वाईट परिणाम होईल. पुढच्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास अडचणी येत असल्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ही स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्याबद्दल विचार केला पाहिजे.''