टोकियो - भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. कोरियाच्या अॅन सॅन हिने दीपिकाचा पराभव केला. या पराभवासह दीपिकाचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
अॅन सॅन हिने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. तिने पहिल्या सेटमध्ये परफेक्ट 10, 10, 10 गुण घेतले. तर दीपिकाला 7, 10, 10 गुण मिळवता आले. दुसऱ्या सेटमध्ये दीपिकाने परफेक्ट 10 गुण घेत चांगली सुरूवात केली. पण तिने पुढील दोन शॉटमध्ये 7, 7 गुण घेतले. दुसरीकडे अॅन सॅन हिने 9, 10, 7 असे गुण घेत दुसरा सेट देखील आरामात जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये दीपकाने 7, 8, 9 गुणांसह एकूण 24 गुण घेतले. तर अॅन सॅन 8, 9, 9 गुण घेत अव्वल राहिली.