मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले भारताचे पाच बॉक्सिंगपटू आगामी नॅशनल पुरूष बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे ते पुढील महिन्यात सर्बियामध्ये होणाऱ्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.
अमित पांघल (52 किलो), मनिष कौशिक (63 किलो), विकास कृष्ण (69 किलो), आशिष चौधरी (75 किलो) आणि सतिश कुमार (91 किलो पेक्षा जास्त) यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. यातील सतिश कुमार याने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. इतर दुसरे बॉक्सिंगपटूंचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते.
विकास, सतिश, आणि आशिष यांना दुखापत झालेली आहे. यामुळे त्यांनी नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेतून माघार घेतली आहे. अमित आणि मनिष यांनी अधिकृत अद्याप या संदर्भात घोषणा केलेली नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, सरावासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसल्याने ते स्पर्धेतून माघार घेऊ शकतात.
सूत्रांनी पीटीआयला सांगितलं की, अमित आणि मनिष यांनी नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण टोकियो ऑलिम्पिकहून परतल्यानंतर त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही.