नई दिल्ली:थाळी फेकपट्टू ( डिस्कस थ्रोअर ) कमलप्रीत कौर हिला अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट ( Athletics Integrity Unit ) ने बंदी घातलेल्या स्टेरॉईड चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर तात्पुरते निलंबित केले आहे. कमलप्रीत यामध्ये दोषी आढळल्यास तिला जास्तीत जास्त चार वर्षांसाठी निलंबित केले जाऊ शकते.
जागतिक अॅथलेटिक्स (संचालक मंडळ) ने बुधवारी ट्विट केले, AIU ने भारताच्या डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौरला तिच्या शरीरात प्रतिबंधित पदार्थ (स्टेनोझोलॉल) उपस्थिती/वापरल्यामुळे तात्पुरते निलंबित केले आहे. हा पदार्थ जागतिक अॅथलेटिक्स अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन करणारा आहे. जागतिक अॅथलेटिक्स डोपिंगशी संबंधित प्रकरणात चाचणी पूर्ण होईपर्यंत खेळाडूला तात्पुरते निलंबित करते.
अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट ही जागतिक अॅथलेटिक्सने स्थापन केलेली स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी पंजाबच्या या 26 वर्षीय खेळाडूला नोटीस बजावून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय विक्रमधारक कमलप्रीतने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावले होते. कमलप्रीत कौनने गेल्या वर्षी पतियाळा येथे 66.59 मीटर डिस्कस फेकून राष्ट्रीय विक्रम केला होता. यापूर्वी 2018 मध्ये तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 61.04 मीटर होती.