दुबई - येथे सुरू असलेल्या एएसबीसी आशियाई युवा आणि ज्यूनियर बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंनी चांगली कामगिरी नोंदवली. भारताचे या स्पर्धेत 3 पदक पक्के झाले आहेत. बॉक्सर रोहित चामोली (48 किलो), अंकुश (66 किलो) आणि गौरव सैनी (70 किलो) यांनी आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे.
भारतीय बॉक्सर रोहित चामोली याने ज्यूनियर मुलांच्या उपांत्यपूर्ण फेरीत अलहसन कादौस स्त्रिया याचा 5-0 ने धुव्वा उडवला. तर अंकुश याने कुवेतच्या बदर शेहाब याला 5-0 अशी सहज धूळ चारत उपांत्य फेरीत धडक दिली.
हरियाणाचा गौरव सैनीचा देखील या स्पर्धेत दबदबा राहिला. त्याने उपांत्यपूर्व फेरीत कुवेतच्या याकूब सदाल्लाह याचा पराभव केला. उभय खेळाडूमधील सामना पंचांनी दुसऱ्या राउंडमध्ये रोखत सैनीला विजयी घोषित केलं.
दुसरीकडे आणखी तीन ज्यूनियर बॉक्सरनीं पहिला सामना जिंकत पुढील फेरी गाठली आहे. आशिष (54 किलो), अंशुल (57 किलो) आणि प्रीत मलिक (63 किलो) पुढील फेरीत पोहोचले आहेत.
यशवर्धन सिह (60 किलो), उस्मान मोहम्मद सुल्लान (50 किलो), नक्ष बेनिवाल (75 किलो), ऋषभ सिंह (81 किलो) यांना पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.