नवी दिल्ली - भारताची राजधानी दिल्लीमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान आज सोमवारी पार पडला. भारताला पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकून देत इतिहास रचणारा नीरज चोप्रा याच्याशिवाय, कास्य पदक जिंकणारा भारतीय पुरूष संघ, कास्य पदक विजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन, कास्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, रौप्य पदक विजेता रवी कुमार दहिया यावेळी उपस्थित होते. या खेळाडूंनी आपला ऑलिम्पिकचा अनुभव सांगितला.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय राज्यमंत्री निशिथ प्रमाणिक यांनी खेळाडूंचा सन्मान केला. यानंतर त्यांनी खेळाडूंची कौतुक केलं. या सन्मान सोहळ्यात सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने आपलं मत मांडत देशवासियांचे मन जिंकलं. नीरज म्हणाला की, सगळ्याचे आभार. हे सुवर्ण पदक माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं आहे.
मी आधी सर्वांना आपलं पदक दाखवू इच्छितो. हे माझं नाही तर संपूर्ण देशाचं पदक आहे. पदक जिंकल्यापासून मी ते खिशात घालून फिरत आहे. विजयानंतर मी शांत झोपू शकलो नाही. ना ही मी व्यवस्थित जेवण करू शकलो आहे. मी जेव्हा या पदकाकडे पाहतो. तेव्हा मला सर्वकाही ठीक असल्याचे वाटतं. कष्ठ तर होतेच पण मनात भीती होती की, कॉम्पिटिशन खूप टफ आहे, असे देखील नीरज पुढे बोलताना म्हणाला. यावेळी नीरजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.