तामिळनाडू - भारताचा बुद्धिबळपटू जी. आकाश हा देशाचा 66वा ग्रँडमास्टर ठरला आहे. तर, गोव्याचा अमेया ऑडी आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने (एफआयडीई) नुकत्याच झालेल्या बैठकीत आकाशच्या ग्रँडमास्टर किताबाची माहिती दिली.
आकाशचे एफआयडीई रेटिंग 2495 आहे. तो म्हणाला, ''ग्रँडमास्टर झाल्याचा मला आनंद आहे. माझे हे रेटिंग 2600 पर्यंत वाढवण्याचे ध्येय आहे. ग्रँडमास्टर ऑफ इंडियाच्या यादीमध्ये स्थान मिळाल्याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हा एक खास क्षण आहे. मी कठोर परिश्रम करत राहीन.''