नाशिक - महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला इगतपुरी तालुका तालीम संघातर्फे स्विफ्ट कार भेट देण्यात आली. एक दिमाखदार सोहळ्यात सदगीर याची जंगी मिरवणूक काढत त्याला कार म्हणून भेट देण्यात आली.
हेही वाचा -रणजीत 'त्रिशतक' ठोकलेल्या क्रिकेटपटूनं पंतला केलं 'रिप्लेस'
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. त्याने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली. टाहाकारी येथील अंबिका विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या मुकेश सदगीर यांचा हर्षवर्धन हा मुलगा आहे. त्याची कौटुंबीक परिस्थिती जेमतेम असून आई ठकूबाई सदगीर या गृहिणी आहेत, तर भाऊ जगन सदगीर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे.
यापूर्वी राज्य आणि देशाच्या नकाशावर कुस्ती पटलावर जिल्ह्यातील अनेक नामांकित पैलवानांनी नेत्रदीप व उज्ज्वल कामगिरी केली. मात्र, पहिल्यांदाच सदगीर यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी किताबाचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन सदगीर हा इगतपुरी तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या गावातील रहिवासी आहे. यापूर्वी इगतपुरी तालुक्यातील असलेले कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन याने सहभाग घेतला होता. तसेच गतवर्षी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने हर्षवर्धन याने इगतपुरी तालुका तालीम महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने यांची भेट घेतली होती. महाराष्ट्र केसरी जिंकल्यावर सदगीर याला स्विफ्ट कार भेट देऊन, असा शब्द त्यांनी दिला होता. सदगीर याची इगतपुरीमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोतकर, आमदार सुहास फरांदे, संदीप गुळवे, अशोक काळे, एकनाथ मुर्तडक, गोरखनाथ बलकवडे यांच्यासह इगतपुरी तालुका संघाचे पदाधिकारी आणि इगतपुरीचे नागरिक उपस्थित होते.