नवी दिल्ली- आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुनिल कुमारने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्याने भारताचा आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात तब्बल २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. सुनिलने ८७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत किर्गिस्तानच्या अझत साल्दिनोव्हचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
अंतिम फेरीत सुनिलने एकतर्फा विजय मिळवला. त्याने किर्गिस्तानच्या अझतला गुण घ्यायची संधी दिली नाही. उपांत्य फेरीत सुनिलला कझाकिस्तानचा प्रतिस्पर्धी अझामत कुस्तुबायेव याचे कडवे आव्हान मिळाले. अझामत १-८ च्या फरकाने आघाडीवर होता. तेव्हा सुनिलने अखेरच्या क्षणात डाव पलटवत सलग ११ गुणांची कमाई केली आणि सामना १२-८ च्या फरकाने जिंकला.