सातारा : हरियाणातील पंचकुला येथे सुरु असलेल्या खेलो इंड़िया यूथ स्पर्धेत सुदेष्णा शिवणकर हिने सुवर्णपदकांची हॅटट्रिक ( Sudeshna Shivankar gold medal hat trick ) केली आहे. 100 मीटर, 4 बाय 100 रिले प्रकारासह 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने सुवर्णपदके पटकावली आहेत. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे सातार्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
सुदेष्णाची एकाच स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रीक -
हरियाणातील पंचकुलामध्ये चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे ( Fourth Khelo India Youth Games ) आयोजन करण्यात आले आहे. दि. 3 जून ते 13 जून या दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खरशी (ता. जावली) गावची कन्या सुदेष्णा शिवणकर हिने वैयक्तिक कामगिरीतील सर्वोच्च 11:79 सेकंद अशी वेळ नोंदवत, 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. चार बाय 100 रिले प्रकारातही तिला सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुदेष्णाने 24:29 सेकंद अशी वेळ नोंदवत एकाच स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.