मुंबई - जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स एका भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मंगळवारी लॉस एंजलिसमध्ये वूड्स यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात वूड्स गंभीर जखमी झाले आहेत. कॅलिफोर्नियाच्या हार्बर यूसीएलए मेडिकल सेंटरने वुड्स यांच्या तब्येतीची माहितीदिली आहे.
कॅलिफोर्नियाच्या हार्बर यूसीएलए मेडिकल सेंटरने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'वूड्स मंगळवारी कार अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. यामुळे त्यांच्या पायावर उशिरा रात्रीपर्यंत शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान, त्यांच्या पायात रॉड घालण्यात आलं आहे.'
लॉस एंजलिस शेरिफचे अधिकारी कार्लोस गोंजालेज यांनी सांगितलं की, 'या अपघातात वूड्स बचावले ही चांगली गोष्ट आहे. अपघात झाल्यानंतर वूड्स शुद्धीत होते. त्यांनी माझ्याशी बातचित केली. ते एका चॅनलसाठी फोटोशूट करण्यासाठी निघाले होते. तेव्हा त्यांचा अपघात झाला.'
दरम्यान, लॉस एंजलिस मधील रोलिंग हिल्स एस्टेट्स आणि रॅंचो पालोस वेरिड्सच्या दरम्यान मंगळवारी सकाळी ७.१२ वाजता ही घटना घडली. वूड्स यांची भरधाव कार अनियंत्रित झाल्यानंतर दुभाजकावर आदळली आणि पलटली. कारमध्ये वूड्स एकटेच होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वूड्स यांना रुग्णावाहिकेच्या साहाय्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टायगर वूड्स यांच्या कारचा अपघात... वूड्स यांच्या अपघातग्रस्त कारची दृश्येही समोर आली आहेत. यात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झालेला असून, एअरबॅगही दिसत आहेत.