बंगळुरू- कर्नाटकचा श्रीनिवास गौडाने रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाऱ्या स्पर्धेत जमैकाच्या उसेन बोल्टचाही वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला होता. त्यानंतर मोदी सरकारने त्याच्यापुढे एक ऑफर ठेवली होती. पण श्रीनिवासने मोदी सरकारची ऑफर धुडकावून लावली आहे.
श्रीनिवास हा दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील मुदाबिदरी गावचा रहिवाशी आहे. कंबालामध्ये (चिखलगुट्टा पद्धतीच्या पारंपरिक बैलगाडी शर्यत) विक्रम नोंदवल्यानंतर तो चर्चेत आला आहे. श्रीनिवासने रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाऱ्या स्पर्धेत १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले. याचा अर्थ गौडाने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले.
जगात सर्वात जलद धावण्याचा विक्रम जमैकाच्या उसेन बोल्टच्या नावे आहे. त्याने १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदात पूर्ण केले होते. श्रीनिवास आणि बोल्टची तुलना केल्यास ०.०३ ने श्रीनिवास पुढे आहे. मात्र, दोघांच्या विक्रमाची तुलना केली जाऊ शकत नाही. कारण श्रीनिवास रेड्यांसोबत चिखलात पळाला होता.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील त्याची दखल घेतली. तो देशाला ऑलिम्पिक पदक जिंकवून देऊ शकतो, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं होतं. महिंद्रा यांच्या ट्विटला क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी कर्नाटकच्या श्रीनिवासनला आम्ही ट्रायलसाठी बोलावणार आहे. 'साई'मधील प्रशिक्षक त्याची ट्रायल घेतील. अॅथलॅटीक्सबाबत भारतामध्ये फार कमी लोकांना जाण आहे. पम आम्ही भारतामधील प्रतिभा वाया जाऊ देणार नाही, असे उत्तर दिले होते.
पण, आता श्रीनिवास यांनी ट्रायलला नकार दिल्याचे वृत्त एका इंग्रजी माध्यमाने दिले आहे. इंग्रजी माध्यमाच्या वृत्तानुसार, श्रीनिवासने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्याने सांगितलं की, माझी तुलना बोल्टशी होत आहे हे पाहून मला आनंद होतो. पण माझी आणि बोल्टची तुलना होऊ शकत नाही. कारण मला धावताना रेड्यांची मदत मिळते. मी बोल्टचा विक्रम मोडू शकत नाही. कारण मी चिखलात धावतो. याउलट बोल्ट चिखलात धावू शकत नाही. तो मैदानात धावतो. बोल्टने जगभरातील चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं आहे. तर मी कंबालामध्ये लोकप्रिय आहे.
हेही वाचा -
हेही वाचा -