महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मॅराडोनाचे निधन ते भारताला व्हाईटवॉश, वाचा क्रीडा आढावा - क्रीडाविश्वातील घडामोडी २०२०

यंदाचे २०२० वर्ष कोरोनाने गाजवले. कोरोनामुळे अनेक गोष्टी थंडावल्या. त्याचा फटका क्रीडाविश्वालाही बसला. या वर्षात क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वांच्या घडामोडींचा आढावा...

sports year ender 2020
YEAR ENDER 2020 : क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वांच्या घडामोडींचा आढावा

By

Published : Dec 29, 2020, 7:03 AM IST

Updated : Dec 29, 2020, 1:37 PM IST

१) ऑस्ट्रेलियन ओपन :

वर्षाचे पहिले ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात सामन्यात जोकोविचने ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमचा पराभव करत विजेतेपद जिंकले. जोकोविचने हा सामना ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ असा जिंकला. जवळपास चार तास चाललेल्या पाच सेटच्या अंतिम सामन्यात थीमने जोकोविचला थकवले. मात्र, अनुभव आणि वेगाचा पुरेपूर वापर करत जोकोविचने बाजी मारली. तर, महिलांमध्ये २१ वर्षीय सोफिया केनिनने एश्लेग बार्टीचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.

ऑस्ट्रेलियन ओपन

२) कोबी ब्रायंट आणि त्याच्या मुलीचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू :

बास्केटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू कोबी ब्रायंटचा २६ जानेवारीला हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. ४१ वर्षीय कोबीसह त्याच्या १३ वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला. आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत कोबीने अनेक विक्रम नोंदवले होते. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएकडून खेळताना त्याने ५ स्पर्धाही खिशात टाकल्या होत्या.

कोबी ब्रायंट

३) तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश :

कोरोनाच्या उद्रेकापूर्वी, न्यूझीलंडमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत न्यूझीलंडने टीम इंडियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला. या मालिकेतील पराभवामुळे तब्बल ३१ वर्षानंतर भारताला व्हाईटवॉश मिळाला. तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या द्विदेशीय एकदिवसीय मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला. यापूर्वी १९८३-८४ आणि १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिजने ५-० असा विजय मिळवला होता. त्यानंतरही भारताने मालिका गमावल्या आहेत. मात्र, पाऊस त्यांच्या मदतीला धावून आला.

विराट कोहली

४) टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाची निवृत्ती :

रशियन टेनिससुंदरी आणि पाच वेळा ग्रँड स्लॅम विजेती मारिया शारापोव्हाने फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. मारियाने वयाच्या ३२ व्या वर्षी टेनिसमधून निवृत होण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये मारियाने विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. तेव्हा तिचे वय अवघे १७ वर्ष होते. २००८ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी तिने ऑस्ट्रेलियन ओपनचे तर, २०१४ मध्ये तिने फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले होते.

मारिया शारापोव्हा

५) यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द :

टेनिसमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी विम्बल्डन स्पर्धा यंदा झाली नाही. कोरोनामुळे ही स्पर्धा अधिकृतपणे रद्द करण्यात आली. आता ही स्पर्धा २८ जून ते ११ जुलै २०२१ या कालावधीत होईल. १९४५ नंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी दुसर्‍या महायुद्धावेळी ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

विम्बल्डन स्पर्धा रद्द

६) थांबलेले क्रिकेट पुन्हा सुरू :

कोरोनामुळे यंदाच्या मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद होते. मात्र, काही कडक नियमांचे पालन करून इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात ८ जुलैला कोरोनानंतरचा पहिला क्रिकेट सामना खेळवण्यात आला. या कसोटी सामन्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तब्बल ११७ दिवसानंतर पुनरागमन झाले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले. त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळली गेली.

इंग्लंड-विंडिज कसोटी मालिका

७) ऐतिहासिक निर्णय...टोकियो ऑलिम्पिक आता पुढच्या वर्षी :

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यात चर्चा झाल्यानंतर यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. कोरोना व्हायरसच्या वाढलेल्या घटनांमुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी १९१६, १९४० आणि १९४४ मध्ये ही मानाची स्पर्धा जागतिक महायुद्धांमुळे रद्द करण्यात आली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी होणार असली तरी, या स्पर्धेला 'टोकियो २०२०' नावानेच ओळखले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टोकियो ऑलिम्पिक

८) महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाची निवृत्ती :

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी सोशल मीडियावर एक व्हिडोओ पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने आतापर्यंत भारतासाठी ३५० एकदिवसीय ९८ टी-२० सामने खेळले असून त्याने अनुक्रमे १०७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही. धोनीसोबत डावखुरा फलंदाज सुरेश रैनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. भारताचा टी-२० स्टार असणाऱ्या रैनाने आत्तापर्यंत २२६ एकदिवसीय, ७८ आंतरराष्ट्रीय टी-२० आणि १८ कसोटी सामने खेळले आहेत. टी-२० आणि एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. रैनाने २२६ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ५६१५ धावा केल्या आहेत.

धोनी-रैना

९) यंदाच्या आयपीएलचे यूएईत आयोजन :

मार्चच्या महिन्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. भारतातील कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच यूएईत आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरमध्ये यशस्वीरित्या पार पडला. अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या विजयासह मुंबई इंडियन्स संघाने पाचव्यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. अशी कामगिरी करणारा मुंबई पहिलाच संघ ठरला.

आयपीएलचा १३वा हंगाम

१०) दिएगो मॅराडोना यांचे निधन :

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे नोव्हेंबरमध्ये हृदयविकाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. टिग्रे येथील निवासस्थानी मॅराडोना यांनी अखेरचा श्वास घेतला. १९८६चा विश्वकप विजेते फुटबॉलपटू मॅराडोना यांच्या निधनावर संपूर्ण जगभरातून दु:ख व्यक्त केले गेले. अर्जेंटिनाला १९८६चा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या मॅराडोना यांच्यासाठी १९९४चा विश्वचषक मात्र अत्यंत वाईट ठरला. उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्याने या विश्वचषकातून त्यांना बाहेर पडावे लागले. या विश्वचषकात ग्रीसविरोधात केलेला गोल हा मॅराडोनाने अर्जेंटिनासाठी केलेला शेवटचा गोल ठरला.

मॅराडोना कालवश

हेही वाचा -ग्लोब सॉकर पुरस्कार : रोनाल्डो ठरला शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू

Last Updated : Dec 29, 2020, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details